स्पर्धा परीक्षांची तयारी करताना…

0
437

स्पर्धा परीक्षांची तयारी कधी व केव्हा सुरू करायची? असा प्रश्न अनेक जणांना पडतो? पदवीनंतर पदवी असा काही सरळ मार्ग नसल्याने, नेमका कधी आणि केव्हा अभ्यास सुरू करायचा हा प्रश्न अनेकांच्या डोक्यात घर करून बसतो. थोडे नियोजन केले तर या परीक्षेचीही तयारी करणे सहजशक्य होऊ शकेल.

मात्र ते करताना तुम्ही नेमक्या कोणत्या परीक्षेची तयारी करता आहात, त्यानुसारही काही गोष्टी बदलू शकतात कारण या परीक्षेचा अभ्यासक्रम व्यापक असतो.
स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जायचे असा विचार असेल तर तयारीसुद्धा बारावीची परीक्षा दिल्यापासूनच सुरू करायला हवी.

डॉक्टर-इंजिनिअर होण्याची स्वप्ने पाहणारी मुले जशी आपली दिशा नक्की करतात तशी दिशा नक्की करता यायला हवी. बारावीची परीक्षा झाल्यानंतर लगेचच स्पर्धा परीक्षासंदर्भात होता होईतो सारी माहिती गोळा करायला हवी. या परीक्षाची माहिती मिळाली.

दिशा ठरली की मग एकेका घटकाची तयारी पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच सुरू करावी. सामान्य अध्ययनातील राज्यघटना, अर्थव्यवस्था, इतिहास, भुगोल, विज्ञान, तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांचं वाचन, त्यासंदर्भातील माहिती यावर लक्ष ठेवून त्या नोंदी ठेवायला हव्यात.

चालू घडामोडी म्हणजे करण्ट अफेअर्स हा स्पर्धा परीक्षांतील मध्यवर्ती भाग. त्याची तयारी करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे आजच्या दिवसापासून ती तयारी तातडीने सुरू केलेली चांगली. त्यासाठी एक इंग्रजी, किमान दोन मराठी वर्तमानपत्रे, विविध मराठी-इंग्रजी साप्ताहिके, मासिके, लोकराज्य, परिवर्तनाचा वाटसरू, योजना ही नियतकालिके नियमितपणे वाचावीत.

याशिवाय भारताविषयी माहिती देणारे ‘इंडिया इअरबुक’ तर महाराष्ट्रविषयी माहिती देणारे ‘महाराष्ट्र वार्षिकी’ ही संदर्भ पुस्तके वापरावीत. मुख्य परीक्षेसाठी कोणते वैकल्पिक विषय निवडायचे याचा विचारही तयारीच्या काळातच सुरू करायला हवा. आपल्याला कोणते विषय आवडतात याचा अंदाज घेऊन ते विषय ठरवावेत.

ते ठरले की संबंधित विषयाची पायाभूत पुस्तके वाचावीत. त्या विषायतला अधिकाधिक तपशिल वाचून माहिती जमवायला सुरूवात केली की अपडेट राहणे सोपे जाते. हे सारे पदवी शिक्षण घेतानाच उपलब्ध वेळेचा सदुपयोग म्हणून सहज करता येते. असा रोज अभ्यास आणि सराव केला तर पदवीनंतर लगेचच या परीक्षा देणे शक्य होऊ शकते. मात्र उगीचच या परीक्षा देण्याची घाई करू नका.

संपूर्ण तयारी झाल्याशिवाय या परीक्षा देण्याचा निर्णय घेऊ नये. किमान एक वर्ष दररोज १०-११ तास सातत्यपूर्ण अभ्यास केला तर तयारी झाली आहे असे म्हणता येऊ शकेल. प्रारंभी पूर्वपरीक्षा देऊ मग मुख्य परीक्षेचा विचार करू असा विचार अजिबात करू नका. मुख्यपरीक्षेचा सविस्तर अभ्यास करूनच पूर्व परीक्षा द्यायचा विचार करावा. अनेकजण आधी पूर्व परीक्षा हेच टार्गेट ठेवतात.

पण त्यापेक्षा मुख्य परीक्षेची पूर्ण तयार करूनच, पूर्वतयारी झाल्यावरच परीक्षा देणे उत्तम ठरते. यूपीएससी/एमपीएससी या ‘स्पर्धा’ त्मक परीक्षा असल्याने त्या इतर परीक्षांपेक्षा वेगळ्या असतात. या परीक्षांची तयारी करण्यासाठी विशेष अभ्यासपद्धतीचा स्वीकार करणे अत्यावश्यक ठरते.

घोका आणि ओका अशापद्धतीने अभ्यास करणे ही पद्धत गैरलागू ठरते. त्यामुळे अभ्यास कसा करायचा ही या परीक्षांच्या तयारीत एक महत्त्वाची पायरी मानली पाहिजे.
परीक्षा द्यायची असे ठरवले की तेव्हाच या परीक्षेचे स्वरूप सविस्तरपणे लक्षात घ्यावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सातत्यपूर्ण तयारी. त्या तयारीचा एक भाग म्हणजे पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बारकाईने पहावा. किंबहुना हा अभ्यासक्रम सतत नजरेसमोर असला पाहिजे.

त्यानंतर आयोगाच्या मागील किमान १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे पद्धतशीर विश्लेषण करावे. त्याआधारे प्रश्नाचे स्वरूप, त्यात होणारे बदल लक्षात घेऊन तयारी करावी. अभ्यासपद्धतीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रत्येक विषयासाठी वाचायच्या संदर्भपुस्तकांची यादी मिळवावी.

कोणत्या विषयासाठी काय वाचायचे आहे याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीत अभ्यास व वेळेचे नियोजन व त्याची अंमलबजावणी मध्यवर्ती ठरते. यासंदर्भात विद्याथ्र्यांनी हे लक्षात ठेवावे की मुख्यपरीक्षेसाठी किमान ७ महिने तर पूर्वपरीक्षेसाठी ५ महिन्याचा कालावधी आवश्यक ठरतो. त्याचप्रमाणे तयारीतील एकूण वेळेपैकी ६० टक्के वेळ वैकल्पिक विषयांसाठी आणि ४० टक्के वेळा सामान्य अध्ययनासाठी निर्धारित करावा. त्याचबरोबर उजळणीद्वारे वेळापत्रक निर्धारित करावे. उजळणीद्वारे आपली तयारी मजबूत करता येते.

या परीक्षांची तयारी करताना हे लक्षात घ्यायला हवे की नुसत्या घोकंपट्टीला काही अर्थ नाही. आकलन व विश्लेषणाची क्षमता विकसित करण्यावर भर द्यायला हवा. महत्त्वाचे म्हणजे पूर्वपरीक्षेच्या संदर्भात वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आणि मुख्य परीक्षेसाठी लेखनाचा सातत्याने सराव करावा.

मुख्य परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी केवळ वाचन व उजळणीवरच अतिरिक्त भर देतात. परिणामी लेखनाच्या सरावाकडे दुर्लक्ष होते. ही चूक टाळण्यासाठी सुरूवातीपासूनच प्रश्नोत्तराचा सराव करायला हवा. यासंदर्भात नियमित सराव चाचण्या देऊन आपल्या चुका शोधून त्या दुरूस्त करण्यावर भर द्यावा. भरपूर सरावाद्वारेच आपली लेखनशैली व अभिव्यक्ती प्रभावी करता येते.

अभ्यास करताना नुस्ते लेखन-वाचन नाही तर याचाही विचार करायला हवा की आपल्याला मुलाखतीचीही तायरी करायची आहे. मुलाखतीची तयारी करतांना आपल्या व्यक्तिगत माहितीपासून ते अभ्यासबाह्य रस, छंद यासगळ्या विषयाची तयारी महत्त्वाची ठरते. मुलाखतीतील सर्व घटकांची तयारी करून अधिकाधिक ‘मॉक इंटरव्ह्यूज’ द्यावेत. संवादकौशल्य सुधारणे हेदेखील अभ्यासाचाच एक भाग आहे.

आपली भाषा, देहबोली आणि उत्तराचा नेमकेपणा या सा-याचा सराव आणि अभ्यास केला तर त्याचा उत्तम उपयोग होतो. एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकच एक पुस्तक वाचून या परीक्षेचा अभ्यास नाही करता येत, ही एक निरंतर चालण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आपण निवडलेल्या विषयासह अन्य विषयांचे चौफेर वाचन, करण्ट अफेअर्स संदर्भात अपडेट असणे, विषयाचे आकलन वाढवणे हा सारा अभ्यासाचाच भाग आहे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here