अपयशाची शिकवणी !

0
219

अपयश हे यशाकडे नेणा-या वाटेतला एक छोटासा टप्पा आहे. तो पार करता येणे यातच पुढचे यश दडलेले असते. अपयश आणि निराशा यात फरक आहे, ब-याचदा यांची गल्लत होऊ शकते. अपयशामुळे कॉन्फिडन्स, प्रेरणा, अतीव दुःख होणे साहजिक आहे. आपण काहीही करण्याच्या लायकीचे नाही,

अशी भावना साहजिकच मनात येऊ शकते आणि त्यातून एखादी गोष्ट मनापासून हवी असेल, त्यासाठी प्रयत्न केला असेल आणि अपयश आले, तर खूप धक्का बसू शकतो. अर्थात काही वेळा अपयश टाळू शकत नाही किंवा वाईट वाटणेही कमी होत नाही. मग अशावेळी आपण काही पथ्ये पाळली, तर पुढे जाण्यासाठी अपयशातून बाहेर पडण्यासाठी खचितच मदत होऊ शकते.

परिस्थितीबद्दल वाईट वाटून घेऊ नका : अपयशाचे वाईट वाटणे, लाज वाटणे, साहजिक आहे. मनाच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची ही प्रक्रिया आहे, असे वाटण्याला योग्य वेळ द्या. हे अतिशय नॅचरल आहे. अशावेळी आपण उगाचच प्रयत्न केला असे वाटू शकते; पण एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे,

हे न करण्यापेक्षा अतिशय महत्त्वाचे आहे. तेव्हा आपण प्रयत्न केला, याचा आनंद बाळगून यातून काय मार्ग निघू शकतो, याचा विचार करा. अनेकदा प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा अपयशाबद्दलची आपली भीती, बाकीचे त्यासंबंधी कसे रिअ‍ॅक्ट करतील, याची जास्त काळजी वाटते. पण बहुतांशी ही भीती फोल ठरते.

दुस-याशी तुलना करू नका : बहुतेकवेळा आपल्याला मिळालेल्या लहानशा यशाची तुलना इतरांच्या यशाबरोबर केली की, आपलं यशही अपयश वाटू शकते. स्वतः मर्यादा जाणून घ्या आणि आपली तुलना फक्त आपल्याशीच करायला शिका. कारण, जगात तुमच्यापेक्षा जास्त हुशार, जास्त सुंदर, जास्त पैसेवाले नक्कीच आहेत. तेव्हा आपल्या जुन्या कामगिरीशी आपली तुलना करा.

बी रिअ‍ॅलिस्टिक : आपल्या अवतीभवती असणा-यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांमुळेही काही वेळा मिळालेले अपयश जास्त मोठे वाटते. अपेक्षांची पूर्तता झाली नाही, तर बाकीच्यांना काय वाटेल, याने खचून जाण्यापेक्षा आपण स्वतःकडून उत्तम प्रयत्न केले होते का, हे तपासून पाहा. त्याचे उत्तर सकारात्मक असेल, तर बाकीच्यांच्या अपेक्षांचे ओझे मनावर घेऊन वाईट वाटून घेऊ नका.

कारण, एखादे अपयश तुमचे व्यक्तिमत्त्व किंवा तुम्ही कसे आहात, हे ठरवत नाही. अपयश हे आपल्याला मिळालेली शिकवण आहे, हे लक्षात ठेवून पुढच्यावेळी जास्त प्रयत्न करण्याचा निश्चय करा.
डोन्ट गिव्ह अप : एका अपयशामुळे पुढे प्रयत्न न करणारे अनेकजण असतात, पण आपण यशाच्या अगदी जवळ आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. प्रयत्नाअंती परमेश्वर म्हणतात, ते खरंच आहे. एखादे काम जमत नाही, म्हणून ते अर्धवट सोडणा-यांपेक्षा प्रयत्न करत राहणा-याला यश मिळते.

थॉमस एडिसनचे उदाहरण कायम लक्षात ठेवा.
अपयशाचे कारण : अपयश आल्यावर त्याचे कारण शोधणे स्वाभाविकच आहे. मात्र, हे करताना काळजी घ्या. स्वतःलाच दोष देणाच्या नादात आपण अपयशाचे खरं कारण शोधण्याचा प्रयत्न करत नाही. कारण शोधताना स्वतःला परिस्थितीची जाणीव होण्याइतका वेळ द्यायला विसरू नका. कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळे अशावेळी दोष देणे किंवा विषय टाळणे अशा भावना येऊ शकतात. अशावेळी चुकांतून शिकण्याची मनःस्थिती नसते. योग्य वेळ गेल्यानंतर अपयशाची कारणमीमांसा करा.

आत्मविश्वास घालवू नका : एका अपयशाने खचून जाण्याने स्वतःचा आत्मविश्वास घालवू नका. यातून काय आणि कसे शिकायला मिळेल, दुसरा मार्ग आहे का, वेगळा प्रयत्न करू शकतो का, या प्रश्नांची उत्तरे शोधा. स्वप्न पाहणे, चांगली गोष्ट आहे आणि हे करत असताना अपयश येणेही स्वाभाविक आहे;

पण तुमची स्वप्ने खरी करण्याची क्षमताही तुमच्यातच आहे, याचा विसर पडू देऊ नका. एखादा दरवाजा बंद झाली की दुसरा दरवाजा, खिडकी उघडते असे म्हणतात. तेव्हा त्यांचा शोध घेण्यासाठी डोळसपणे परिस्थितीकडे बघा. यशस्वी झालेले काही इतरांपेक्षा वेगळे नसतात, फक्त परिस्थितीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन असामान्य असतो.

 

Loading...
SHARE
Next articleओळखा मनाचा कल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here