यशासाठी हवे योग्य अभ्यासतंत्र

0
229

कॉमर्समधून पदवी घेतल्यानंतर संजयने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासूनच तो रोज दहा ते बारा तास अभ्यास करत होता. खेळ, मनोरंजन अथवा कुठे फिरण्यात, मौजमजा करण्यात तो कधीच वेळ घालवत नसायचा. त्याच्या खोलीचा दरवाजा कायमच बंद असायचा.

इतकी मेहनत करूनही संजय आजवर कोण्याही स्पर्धा परीक्षेच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता.
दुसरीकडे कायम हसरा आणि फ्रेश असलेला विजय. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटनच्या मैदानात तो केवळ सक्रियच नसायचा तर योग्य धोरण आखून आपल्या संघाला विजयही मिळवून देत होता.

दिवसातील केवळ चार ते पाच तास अभ्यास करूनही प्रत्येक वर्गात तो पहिला असायचा. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांची तयार सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात पूर्व, मुख्य आणि मुलाखत क्वालिफाय करून आयएएस म्हणून त्याची निवड करण्यात आली.

वर दिलेली दोन्ही उदाहरणे ही प्रातिनिधीक आहेत. आपल्या आजूबाजूला दोन्ही प्रकारचेही विद्यार्थी दिसून येतात. या दोघांचीही तुलना करण्याचा प्रयत्न केल्यास अभ्यासाच्या पद्धतीमध्ये असलेला दोष आणि त्याबाबतचे गैरसमज आढळतील.

खेळ, मनोरंजन, विरंगुळा यांपासून दूर राहून अखंड स्वत:ला पुस्तकांमध्ये गुरफटुन घेतल्याने आपल्या दूरदृष्टीचा आणि व्यक्तिमत्त्वाचाही विकास होत नाही. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणून ती पाठ करू शकता; मात्र त्यामुळे आपले ज्ञान, व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी किती तास अभ्यास करता यापेक्षा तो कसा करता याला अधिक महत्त्व आहे.

रोज १२ ते १४ तास एकट्याने अभ्यास करण्याने साचलेपण येण्याची शक्यता असते. याउलट पाच-सहा तास स्वयंअध्ययन करणे आणि इतर वेळी गटचर्चा, मार्गदर्शन क्लासेसना उपस्थिती लावणे, मानसिक आरोग्यासाठी व्यायाम करणे, चालणे, धावणे यांसारख्या गोष्टी केल्याने मन प्रसन्न राहते, अभ्यास उत्तम होतो आणि ताजंतवानंही राहायला होतं. यामुळे मेंदूचा विकास उत्तम होतो.

परिणामी, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाणे शक्य होते आणि निकालांवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
शिक्षण हे केवळ रट्टा मारण्यासाठी नसते, तर एक जबाबदार, यशस्वी आणि संवेदनशील माणूस बनविण्यासाठी शिक्षण घेतले जाते. कोणत्याही सरळधोपट मार्गावर चालण्यापेक्षा नवनव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी विद्याथ्र्यांनी सदैव तत्पर असायला हवे.
शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणे म्हणजे केवळ पदव्या मिळविणे अथवा उत्तीर्ण होणे इतकेच नसते. शालेय पुस्तकांचा व्यवहारिक जीवनात फारसा उपयोग होत नाही.

याउलट नेतृत्त्वगुण, क्रीडाकौशल्ये, आकर्षक व्यक्तिमत्त्व या गोष्टी आपल्याला करिअरबरोबरच जीवनातील यशासाठीही उपयोगी ठरतात. त्यामुळेच स्पर्धा परीक्षा असोत वा कोणत्याही परीक्षा त्यासाठी अभ्यासाचे तंत्र जाणून घेणे आवश्यक असते.

आपले वेळापत्रक आखताना त्यामध्ये काही तास हे रिफ्रेश होण्यासाठी, मनाला आनंद देणा-या गोष्टी करण्यासाठी असायलाच हवेत. मानसिक आरोग्य उत्तम असल्याखेरीज केलेला अभ्यास फलद्रुप होत नाही, हे लक्षात ठेवायला हवे

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here