स्पर्धेच्या युगातील सक्सेस मंत्र

0
305

अलीकडच्या काळात स्पर्धा वाढली आहे, हे आपण वारंवार ऐकत असतो. पण या वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी काही योग्य प्रयत्न देखील करणे खूप आवश्यक असते. तरूण वयात बहुतेक वेळा अभ्यासाव्यतिरिक्त प्रत्येक काम चांगले वाटत असते.

एखाद्याला फिरणे आवडते, एखाद्याला चित्रपट बघणे आवडते, कोणाला टीव्हीचे वेड असते तर कोणी इंटरनेटच्या नादात अडकलेले असते. इतक्या सर्व आकर्षणामध्ये अभ्यासात मन लागणे सोपे नसते हे खरे आहे. पण जीवनात मेहनत आणि मनापासून अभ्यास करणे खूप गरजेचे आहे हेच सत्य आहे. अभ्यास हा केवळ करिअर बनवण्यासाठी मदत करतो असे नाही तर आपला आत्मविश्वास देखील वाढवतो.

म्हणून अभ्यासाचे महत्त्व वेळीच ओळखून काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात आणि शिक्षणाचा संपूर्णपणे लाभ घ्यावा. आपले जीवन चांगल्या शिक्षणाद्वारे घडवावे. त्यासाठी काही गोष्टी स्वतःच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवाव्यात आणि त्याचे पालन करावे.

अभ्यासाकडे दुर्लक्ष नको :
आयुष्यात काहीही बनायचे असले तरी अभ्यासाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करू नये. तुम्हाला मॉडेल, चित्रपट अभिनेता, अभिनेत्री किंवा अन्य काही बनायचे असले तरी शिक्षणाची जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका असते हे लक्षात घ्यावे. अभ्यास आपले विचार, मेंदू विकसित करतो आणि इतर अनेक मार्ग दाखवतो, आत्मविश्वास वाढवतो.
आपल्या योग्यतेवर

लक्ष केंद्रीत करावे :
करिअरसाठी फार मोठे ध्येय ठेवून त्रास करून घेऊ नये. स्वतःचे तटस्थपणे मूल्यांकन करावे. आपल्या सकारात्मक गोष्टींची एक यादी बनवावी आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न करावा. करिअर आणि विषयांची निवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. या विषयावर आपले आई-वडिल किंवा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याशी मोकळी चर्चा करून सल्ला घ्यावा. आपली आवड सांगावी.

कारण आपल्या आवडीकडे लक्ष दिल्यामुळेच यशाची शक्यता वाढते. अर्थात आपले म्हणणे योग्य पद्धतीने व्यक्त करावे म्हणजे, सर्वजण गांभीर्याने त्याकडे लक्ष देऊ शकतील. निवडलेल्या करिअरबाबत आई-वडिलांना पूर्णपणे माहिती करून द्यावी. करिअरचे भविष्य, शक्यता, वेतन, काम करण्याच्या पद्धतीत यावर विचार विनिमय करावा. म्हणजे त्यांच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही.

अधिक माहिती मिळवावी :
ज्या क्षेत्रात करिअर करायचे त्या क्षेत्रातील प्रस्थापित लोकांकडून त्यातील चांगल्या-वाईट आणि प्रारंभी येणा-या अडचींबाबत संपूर्ण माहिती एकत्र करावी.

ग्लॅमरला प्राधान्य नको :
ग्लॅमरप्रधान करिअर तरुणाईला भुरळ घालत असतात. अभिनय, मॉडेलिंग, एअर हॉस्टेस, पत्रकार किंवा पंचतारांकित हॉटेलमधील फ्रंट ऑफिसचे काम दिसायला खूप ग्लॅमरस दिसते; पण या करिअरमध्ये अपार मेहनत, निराशा, शॉर्ट टर्म मागणी, इतर अनेक गोष्टींच्या अडचणी असतात. त्यामुळे विचार करून क्षेत्राची निवड करावी.

वास्तववादी बनावे :
स्वप्न बघण्याऐवजी वास्तववादी विचार करावा. स्वप्ने जरूर पहावीत, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत पण प्रत्येक व्यक्ती त्या उंचीवर पोहोचू शकत नाही किंबहुना, दुस-या व्यक्तीसारखे बनण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला ओळखा, स्वतःचा कल जाणून घ्या आणि त्या दिशेने जा. या मार्गावर स्वतःला झोकून द्या; मग यश तुमचेच असेल !

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here