ओळखा मनाचा कल

0
211

आपण हाती घेतलेल्या एखाद्या अवघड जबाबदारीच्या सुरूवातीला आपल्या मनाचा कल कसा आहे, त्यावरून त्या जबाबदारीचे अंतिम यशापयश ठरत असते. कोणत्याही क्षेत्रात संधी अमर्याद असतात. प्रश्न त्या राबवण्याच्या मनाच्या कलाचा असतो. किंबहुना, प्रत्यक्ष घडामोडीपेक्षा मनाचा कलच अधिक महत्त्वाचा ठरतो.

एक साधा माणूस नेहमीच तुटपुंज्या उत्पन्नाबद्दल कुरकूर करायचा. त्याच्या चेह-यावर आनंद म्हणून कधी दिसायचा नाही. एके दिवशी मात्र त्याच्यात बदल झालेला दिसला.

चेहरा आनंदी आणि समाधानी होता. तो उल्हासित वाटत होता. ‘अहो आश्चर्यम’ म्हणून त्याला त्यामागचे रहस्य विचारले. त्यावर तो म्हणाला, ‘कालपर्यंत मी माझ्या पायात वहाणा नाहीत, म्हणून दुःखी होतो; पण काल मी दोन्ही पाय तुटलेला माणूस पाहिला. मग मला वाटू लागले या माणसापेक्षा पायात वाहणा नसल्या, तरी मी अधिक सुखी आहे. निदान मी दोन पायांनी चालू तरी शकतो.’ त्याची वृत्ती बदलली ती मनाच्या कलातील बदलामुळे.

अर्थात ज्याला कुरकूर करायची तो करत राहणारचं. एका शेतक-याच्या शेतात एका वर्षी बटाट्याचे उत्तम पीक आहे; पण त्याच्या चेह-यावर आनंद नव्हात. त्याला चिंता होती ‘पीक उत्तम आलंय; पण आता डुकरांना घालायला बटाट कुठून आणायचे?’ आपण जर स्वार्थी असलो, तर इतरांचा संशय सतत येत राहणार.

आपली वृत्ती उदार असेल, तर आपण तितक्याच उदार विचारानं इतरांवर विश्वास टाकू.आपण अंतर्यामी, प्रामाणिक असलो, तर इतरांकडे ‘हे दगाबाज’ म्हणून पाहणार नाही.

थोडक्यात, इतरांकडे पाहणे म्हणजे आरशात स्वतःची प्रतिमा पाहण्यासारखं आहे. म्हणूनच, आपल्या मनाचा कल आपण यशस्वी होणार की नाही ते ठरवतो.

ज्याची वृत्ती सकारात्मक विचार आणि कृती करण्याची आहे, ज्याला आव्हान स्वीकारणं आवडतं, कठीण परिस्थितीला तोंड देण्यास जो घाबरत नाही, त्याला अर्ध यश या मनाच्या कलामुळं प्राप्त होतं. उलट नकारात्मक भूमिका घेणारा, संकुचित, पराभूत मनोवृत्तीचा, नवनव्या कल्पनांना दूर लोटणारा माणूस यशस्वी होण्याची शक्यता कमीचं.

कमालीच्या मंदीच्या काळात, सर्वत्र निरुत्साहाचं वातावणर असताना ‘उद्याचं काय’ या चिंतेत उद्योजक असतात. त्यावेळी एका वक्त्याला तेथील ‘चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ मध्ये व्याख्यानाला बोलावले. त्याने भाषणाच्या सुरूवातीलाच एका मोठ्या पांढ-याशुभ्र कागदावर एक छोटा काळा ठिपका काढला आणि कागदावर काय दिसते आहे, हे उपस्थितांना विचारले.

बहुतेकांनी ‘काळा ठिपका’ असे उत्तर दिले. त्यावर तो म्हणाला, ‘एवढ्या मोठ्या पांढ-याशुभ्र कागदाऐवजी तुम्हाला फक्त काळा ठिपका दिसतोय? तो विसरा आणि उरलेला शुभ्र कागद पहा. परिस्थिती आपोआप बदललेली दिसेल.’ मनाचा कल म्हणजे दुसरे काय?

 

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here