मंत्र सकारात्मकतेचा

0
348

आजकाल सतत ‘बी पॉझिटिव्ह’ किंवा ‘सकारात्मक विचार’ हे शब्द आपल्याला ऐकू येतात किंवा आपण तरी बोलताना ब-याचदा वापरत असतो. पण त्यासाठी मुळात आपण विचारसरणी बदलू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर काय आहे हे शोधायला हवे.

आपली विचारसरणी म्हणजे आपल्या मनातील काही ठाम समजुती, घट्टपणे बसलेली आपली विचारांची चौकट. या विचारांच्या चौकटी एखाद्या फिल्टरसारख्या आपल्या मनासमोर घट्ट बसलेल्या असतात, जसे आपल्या डोळ्यांमध्ये लेसेन्स बसवितात तितक्याच बेमालूमपणे विचारांचे फिल्टर हे आपल्या मनावर घट्ट बसलेले असतात.

त्यातूनच आपण सभोवतालच्या जगाकडे पाहतो, समोर घडणा-या घटनेचा अर्थ त्यानुसार लावतो, तो प्रसंग किंवा त्याचं फलित आपल्या फायद्या-तोट्याचं किंवा आपल्या इच्छेशी सुसंगत किंवा विसंगत हे झटकन ठरवतो आणि त्यानुसार प्रतिक्रिया देतो.

उदाहरणार्थ, आपण ऑफिसमध्ये पोचल्या पोचल्या बॉसने बोलविल्याचा निरोप मिळतो. आता नेमकं काय ऐकावं लागणार असा विचार करत आपण केबिनमध्ये जातो. बॉस पुसटसं स्मित हास्य करून एक पाकिट हातात ठेवतोे. हातातील पाकीट पाहून ‘मेमो’ आहे की काय या कल्पनेने आपल्या पोटात एकदम खड्डा पडतो. अंगाला दरदरून घाम फुटतो. आतमध्ये बढतीचे पत्र बघून भलताच आनंद होतो.

अगदी खळखळून हसू फुटते आणि सगळं काही छान छान वाटायला लागते. म्हणजेच जोपर्यंत प्रसंग घटना किंवा समोरची व्यक्ती बदलत नाही, तोपर्यंत आपल्या विचारात व वागण्यात बदल करण्याची गरज नाही, असा हटवादी दृष्टिकोन आपण घेतो.

संगणकामध्ये ज्याप्रमाणे काही कामं आपोआप घडतात (ज्याला डिफॉल्ट असं म्हटलं जातं) त्याप्रमाणे आपल्या मनातील समजुतींचा डिफॉल्ट असतो.

त्यामुळे आपण चुकीचा प्रतिसाद देत असतो तेव्हा केवळ त्या प्रतिसादाचे विश्लेषण करून भागणार नाही, तर त्यामागील विचारांतील जो डिफॉल्ट असेल तो शोधून सुधारावा लागेल.

काही वर्षांपूर्वी ‘ब्रिटीश जर्नल ऑफ मेडिसीन’ या नियतकालिकामध्ये औषधाच्या गोळ्यांच्या रंगाबद्दल एक लेख आला होता. टॉनिकची गोळी लाल असलेली, तर झोपेची गोळी निळी असलेली बहुसंख्य लोकांना आवडते. अँटिबायोटिकची गोळी हिरव्या-पिवळ्या रंगात आवडते, म्हणजे औषधाची गोळी घेतानाही आपण त्या गोळीवर काय विचार करीत असतो, हे महत्त्वाचे असते.

अनेकदा काम्पोजने झोप येते, पण प्लासिडॉक्स ही गोळी प्रभावी वाटत नाही. खरे तर दोन्ही एकाच प्रकारची व एकाच क्षमतेची औषधे पण झोप येणे म्हणजे काम्पोज हे समीकरण आपल्या डोक्यात पक्के बसलेले असते. त्यामुळे घडणा-या प्रसंगाचा, समोरच्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्याचा आपल्यावर परिणाम कसा व किती होणार हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

आपल्या मनातील विचारसरणीच आपला स्वभाव ठरवीत असते हे आपण लक्षात घ्यायला हवे. कोणत्याही प्रसंगी आपली जबाबदारी आपण स्वखुशीने स्वीकारली व स्वतःच्या विचारांना वेगळी दिशा दिली तर आपण आपला स्वभाव बदलू शकतो. यासाठी आपण आपली स्वगताची भाषा बदलायला हवी. जबाबदारी टाळणारी भाषा टाळून जबाबदारी स्वीकारण्याची भाषा आपल्या तोंडी ठेवायला हवी.

इतरांच्या दोषांवर वाद न घालणे व स्वतःच्या दोषांचे समर्थन न करता, आपली चूक असेल तर चटकन मान्य करून त्यातून चूक सुधारण्याची सवय लावून आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करा.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here