यूपीएससी मुख्यपरीक्षा : लेखनक्षमतेचा विकास

0
345
2018 Latest govt Jobs in Maharashtra Latest Jobs News. Talathi Bharti 20018 Updates all type of government mpsc jobs.(NMK)ll Over India. Bank Jobs,nmk job Latest Job Opening In Maharashtra
2018 Latest govt Jobs in Maharashtra Latest Jobs News. Talathi Bharti 20018 Updates all type of government mpsc jobs.(NMK)ll Over India. Bank Jobs,nmk job Latest Job Opening In Maharashtra

यूपीएससी परीक्षेतील पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी अभ्यासक्रमातील विषयांचे पद्धतशीरपणे केलेले आकलन

 

यूपीएससी परीक्षेतील पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी अभ्यासक्रमातील विषयांचे पद्धतशीरपणे केलेले ‘आकलन’ ही मूलभूत बाब ठरते यात शंका नाही. परंतु, यापूर्वीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे या परीक्षेच्या प्रत्येक, भिन्न टप्प्यात आकलन क्षमतेबरोबरच दुसरी एखादी विशिष्ट क्षमता व कौशल्य याची गरज भासते. त्यादृष्टीने विचार करता यूपीएससी मुख्य परीक्षेत लेखनक्षमतेचा विकास केवळ आवश्यकच नाही तर निर्णायकही ठरतो.

केंद्र लोकसेवा आयोगाने म्हटल्याप्रमाणे मुख्य परीक्षा ही संपूर्णत: लेखी स्वरूपाची परीक्षा आहे. विद्यार्थ्यांचे पात्र होणे अथवा अपात्र ठरणे हे मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीत प्राप्त केलेले गुण यावरच आधारित असते.

मुख्य परीक्षेसाठी १,७५० तर मुलाखतीसाठी २७५ गुण निर्धारित केले आहेत. स्वाभाविकच, मुख्य परीक्षा हा अनन्यसाधारण व निर्णायक टप्पा ठरतो यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे या टप्प्यासाठी आवश्यक लेखनक्षमतेचा विकास करणे अत्यंत आवश्यक ठरते.

मुख्य परीक्षेच्या लेखी स्वरूपामुळे त्यातील प्रत्येक विषयातील प्रश्नाचे उत्तर लिखित स्वरूपातच देणे बंधनकारक असते. या बाबतीत पुढील काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते.

> मुख्य परीक्षेतील प्रत्येक प्रश्नासाठी गुणमर्यादा नमूद केलेली असते. संबंधित प्रश्न किती गुणांसाठी आहे यानुसारच उत्तर लिहिणे श्रेयस्कर.

> प्रत्येक प्रश्न किती शब्दमर्यादेत लिहायचा आहे, हे देखील प्रश्नपत्रिकेत नमूद केलेले असते. या शब्दमर्यादेचे भान ठेवनूच उत्तराचा आकार ठरवावा लागतो.

> मुख्य परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न विविध स्वरूपाचे असतात. स्पष्ट करा, वर्णन करा, उलगडून दाखवा, भाष्य करा, टिप्पणी करा, परीक्षण करा, मूल्यमापन करा, मीमांसा करा, चिकित्सक चर्चा करा, तुम्हास मान्य आहे का, भवितव्य सांगा, उपाययोजनांचा आढावा घ्या अशा कमालीच्या विविध तऱ्हेने प्रश्न विचारले जातात. त्यामुळे उत्तर लिहिताना संबंधित प्रश्न काळजीपूर्वक वाचून, त्याची मागणी लक्षात घेऊन सुसंगत प्रतिपादन तयार करावे लागते.

त्यासाठी प्रश्नातील मध्यवर्ती शब्द काय आहे, त्याचा रोख काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अर्थात यासाठी प्रश्न योग्य रीतीने समजून घेण्याची आकलन शक्ती जशी महत्त्वाची तसेच त्यानुसार लेखन करण्याची क्षमतादेखील
अत्यावश्यक ठरते.
> निबंधाच्या स्वतंत्र पेपरमध्ये दोन विषयांवर निबंध लिहायचा असतो. या पेपरसाठी आवश्यक लेखनशैली प्राय: वर्णन- स्पष्टीकरण- विश्लेषणात्मक असते. तांत्रिकतेला यात फारसा वाव नसतो. त्यामुळे प्रस्तावनेपासून मुख्य गाभा ते समारोपापर्यंत परिच्छेदाच्या स्वरूपात निबंधाची रचना करून आपल्या प्रतिपादनात सुसूत्रता, सुसंगती, सलगता या बाबींची हमी द्यावी लागते.

> मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयावरील प्रश्नांची उत्तरेदेखील प्राय: निबंधवजा लिहिणे अभिप्रेत असते. म्हणजे प्रत्येक उत्तर मुद्दय़ांच्या स्वरूपात, तांत्रिकपणे लिहिणे अपेक्षित नसते. त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे निबंधाप्रमाणे परिच्छेदाच्या स्वरूपात सुरुवातीपासून समारोपापर्यंत सलगता व सुसंगती राखत विकसित करावी लागतात.

अर्थात काही वैकल्पिक विषयांमध्ये मुद्दय़ांच्या स्वरूपातील उत्तराची अपेक्षा असते. मात्र, वैकल्पिक विषयातील सर्वच प्रश्नांची उत्तरे सामान्य अध्ययनाप्रमाणे मुद्दय़ांच्या स्वरूपात लिहिणे गरजेचे नसते.

> सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सपकी पहिले तीन पेपर निराळ्या स्वरूपाचे (ज्यात विषय, त्याचा अभ्यासक्रम, त्यावर आधारित प्रश्न अशी एक चौकट असते) आणि ‘नतिकता, सचोटी आणि दृष्टिकोन’ हा चौथा पेपर बऱ्याच अंशी भिन्न असतो. पहिल्या तीन पेपरमध्ये अनुक्रमे २५, २० आणि २० तर चौथ्या पेपरमध्ये १४ प्रश्न विचारले जातात. चौथ्या पेपरमध्ये प्रश्नांची संख्या कमी असते. कारण या पेपरचा अभ्यासक्रम आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेचा पुरेपूर कस पाहणारे असतात.

विद्यार्थी अभ्यासक्रमातील संकल्पना आणि विचार यांचे उपयोजन करू शकतो का? आजच्या स्थितीत त्यांचे महत्त्व प्रस्थापित करू शकतो का? परिस्थितीजन्य प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो का? विविध प्रसंग आणि प्रकरणांत कसा निर्णय घेतो? अशा विविध प्रकारे विद्यार्थ्यांची विचारशक्ती तपासली जाते. म्हणूनच सामान्य अध्ययनाचा चौथा पेपर आजपर्यंत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडले आहे याचे मूल्यमापन करू पाहतो. त्यामुळे या पेपरमधील उत्तरे निराळ्या पद्धतीने लिहावी लागतात.
सामान्य अध्ययनातील पहिल्या तीन पेपरमध्ये प्रश्नांची संख्या जास्त असते. तीन तासांत जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे लिहिणे अत्यावश्यक असल्याने वेगळ्या अर्थाने लेखनक्षमतेची कसोटी लागते. त्यामुळे बहुतांश प्रश्नांची उत्तरे मुद्दय़ांच्या स्वरूपात लिहावी लागतात.

अशा रीतीने, मुख्य परीक्षेतील विविध विषय भिन्न स्वरूपाच्या लेखन पद्धतीची मागणी करतात हे लक्षात ठेवावे लागते. तथापि, एकंदर मुख्य परीक्षेचा विचार करता प्रश्नासाठी निर्धारित गुण, शब्दमर्यादा आणि प्रश्नाचे स्वरूप या बाबी लक्षात घेऊन तीन तासांत संपूर्ण पेपर सोडवणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी लेखनाचे कसब विकसित करावे लागते.

लेखनक्षमता म्हणजे साहित्यिक, अलंकारिक भाषेत लिहिणे नव्हे तसेच सुंदर, मोत्यासारख्या अक्षरात लिहिता येणे म्हणजेही उत्तम लेखन नव्हे. तर त्या-त्या विषयातील पारिभाषिक शब्दांचा वापर, अर्थपूर्ण तसेच व्याकरणदृष्टय़ा अचूक वाक्यरचना, शुद्धलेखन, विरामचिन्हांचा योग्य वापर आणि साधी भाषा या बाबी लेखनक्षमतेत मूलभूत मानल्या जातात. या क्षमतेचा विकास करण्यासाठी विविधांगी वाचन आणि लेखनाचा भरपूर सराव उपयुक्त ठरतो.

छोटी पुस्तके, विविध नियतकालिके व वर्तमानपत्रातील मुख्य पृष्ठकथा आणि मोठे लेख यांचे वाचन करून त्यातील प्रतिपादन सारांश रूपात, थोडक्यात लिहिण्याचा सराव करावा.

स्वत: त्याचे वाचन करून इतरांकडूनही त्याचे मूल्यमापन करवून घ्यावे. आवश्यकता भासल्यास एकाच विषयावर वेगवेगळ्या शब्दमर्यादेत आणि संभाव्य प्रश्न विविध प्रकारे लिहून पाहावेत. त्यामुळे संपादनाचे कौशल्य विकसित होईल, जेणेकरून एखाद्या उत्तरात नेमका कोणता भाग मध्यवर्ती करायचा, त्यात कशावर भर द्यायचा आणि कोणत्या बाबीस कात्री लावायची अथवा ते थोडक्यात लिहायचे हे कौशल्य अवगत करता येईल.

आपण लिहिलेल्या उत्तराचे मूल्यमापन करताना ‘आशय’ (विषय, मुद्दे) या घटकाबरोबरच ‘अभिव्यक्ती’ (सादरीकरण) या घटकाकडेही लक्ष द्यावे. त्यामुळे भाषा, लेखनपद्धती, संदर्भाचा वापर, उत्तराची रचना अशा सादरीकरणातील विविध बाबींकडे सुरुवातीपासूनच लक्ष देता येईल. शेवटी वेळेचे नियोजन साधण्यासाठी सराव प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवाव्यात. म्हणजेच वाचनाबरोबर लेखनाचा प्रत्यक्ष सराव करून मुख्य परीक्षेसाठी आवश्यक प्रभावी लेखनक्षमतेचा विकास साधता येईल आणि यूपीएससीतील अपेक्षित पद लवकरात लवकर प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त गुण मिळवता येतील.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here