मुलाखतीची तयारी ; व्यक्तिगत माहिती आणि आवश्यक कागदपत्रे

0
512

मुलाखतीच्या तीन-चार दिवस आधीच सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरेशा प्रमाणात त्यांच्या सत्यप्रती (attested) आणि फोटो इत्यादी जमा करून घ्यावेत. कागदपत्रांचा क्रम पुढीलप्रमाणे असावा

उमेदवाराने आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरताना तयार केलेले किंवा अद्ययावत केलेले प्रोफाइल हा एका अर्थाने मुलाखतीचा अभ्यासक्रम मानला जातो. मुलाखतीची दिशा ठरते ती या प्रोफाइलमधून सादर केलेल्या वैयक्तिक माहितीच्या आधारे. सर्वसाधारणपणे ६० टक्के ते ७० टक्के प्रश्न उमेदवाराच्या वैयक्तिक माहितीच्या आधारावर विचारले जातात.

उमेदवाराची वैयक्तिक माहिती ऑनलाइन प्रोफाइलद्वारे मुलाखत मंडळाकडे उपलब्ध असते. पण यातील उमेदवाराचे नाव, गाव या व्यक्तिगत माहितीचे पहिले व दुसरे पान मुलाखत मंडळासमोर नसते. या व्यतिरिक्त उमेदवाराचे छंद, विशेष प्रावीण्याचे विषय, शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, पदांचा पसंतीक्रम अशी सर्व माहिती पॅनलसमोर असते. या माहितीच्या आधारे मुलाखत घेतली जाते.

त्यामुळे प्रोफाइलमध्ये विचारण्यात आलेली माहिती खूप काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. छंद, विशेष प्रावीण्याचे विषय (Extra Curricular activities) इत्यादी माहिती संक्षिप्त मात्र परिपूर्ण असायला हवी.

मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता, अधिसूचनेतील अर्हता, अटींनुसार मूळ कागदपत्रांच्या आधारे तपासली जाते. अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्रे सादर करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाते.

आवश्यक कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जात नाही. त्याची उमेदवारी रद्द केली जाते.

* मुलाखतीच्या तीन-चार दिवस आधीच सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरेशा प्रमाणात त्यांच्या सत्यप्रती (attested)  आणि फोटो इत्यादी जमा करून घ्यावेत. कागदपत्रांचा क्रम पुढीलप्रमाणे असावा :

*जन्मतारखेचा पुरावा

*दहावी, बारावीची प्रमाणपत्रे, पदविका (असल्यास), पदवी, पदव्युत्तर पदवी (असल्यास),  डॉक्टरेट (असल्यास) इत्यादी गुणपत्रके व प्रमाणपत्रे.

* मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत जातीचा व अधिवासाचा दाखला.

* विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत विवाहानंतर नाव बदलल्याचा दाखला.

* आरक्षित संवर्गातील उमेदवारांसाठी नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र.

* मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र.

* संगणक हाताळणीसंदर्भातील प्रमाणपत्र.

* अपंग उमेदवारांच्या बाबतीत अपंगत्वाचे प्रमाणपत्र.

* लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन.

* माजी सैनिकांच्या बाबतीत आवश्यक ते पुरावे.

* अधिवास प्रमाणपत्र.

* वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र.

अशा क्रमाने कागदपत्रांचे फायलिंग करावे. फाइल शक्यतो प्लास्टिक कोटेड, पारदर्शक असावी. जेणेकरून वजनाने हलकी व सांभाळायला सोपी होईल. मिळालेले पुरस्कार, सन्मानपत्रे, आधीच्या नोकरी संदर्भातील प्रमाणपत्रे, आधीच्या सेवेतील निवड व त्या सेवेशी संबंधित कागदपत्रे, मिळालेले पुरस्कार, सन्मानपत्रे इत्यादी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत नाही.

बायोडेटामध्ये छंदांचे, विशेष प्रावीण्याचे विषय  याबाबत संक्षिप्त मात्र परिपूर्ण माहिती लिहावी. सामान्यपणे मुलाखतीची सुरुवात ही बायोडेटातील माहितीवर आधारित प्रश्नांतूनच होते. उमेदवारासंदर्भातील सर्व माहिती पॅनलसमोर असते. त्यावरूनच प्रश्नांची सुरुवात होते. त्यामुळे मुलाखतीच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उमेदवारांनी आपल्या प्रोफाइल बायोडेटावर आधारित प्रश्न तयार करावेत व त्यांची तयारी करावी.

वैयक्तिक माहितीवर आधारित प्रश्नांची स्पष्ट व वस्तुनिष्ठ उत्तरे द्यावीत. त्यात संदिग्धता असू नये. मुलाखत मंडळ तुमचा प्रामाणिकपणा, बोलण्यातील पारदर्शकता आणि स्पष्टता तपासत असतात. प्रोफाइलमध्ये बायोडेटात लिहिलेली माहिती व तुमच्या उत्तरांतील वस्तुनिष्ठ माहिती यांत फरक असता कामा नये. ही गफलत तुमच्याविषयी नकारात्मक  मत बनण्याचे कारण बनू शकते.

म्हणूनच प्रोफाइलमधील प्रत्येक शब्दाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ- सुरुवातीच्या प्रश्नांत पदवीसाठी कला शाखा विषय का निवडली, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रश्नाचे उत्तर देताना अनावश्यक तर्क मांडण्यापेक्षा, मला कला विषयांत रस असल्याने मी ते निवडले असे साधे आणि सरळ उत्तर असावे.

उगाच ओढूनताणून तर्क मांडू नयेत. एखाद्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला असाल किंवा पदवी परीक्षेपर्यंत दोन परीक्षांमध्ये अंतर असेल तर त्याबाबत तुम्हाला विचारले जाऊ शकते. अशा वेळी सत्य माहितीच मंडळासमोर ठेवावी.

तुमचे पदवी परीक्षेतील विषय, त्या विषयाशी संबंधित काही पुस्तके, लेखक याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमच्या पदवी विषयांच्या संदर्भाने चालू घडामोडींवर प्रश्न विचारून तुम्हाला किती अद्ययावत माहिती आहे हे तपासले जाऊ शकते. तुमच्या पदवी/ पदव्युत्तर विषयाचे ज्ञान प्रशासकीय सेवेत किती आणि कसे उपयुक्त ठरू शकते हे विचारले जाऊ शकते.

पदांचा पसंतीक्रम

मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने पदांचा पसंतीक्रम आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतच देणे आवश्यक असते अन्यथा अधिसूचनेत नमूद केलेल्या पदक्रमांकानुसारच उमेदवाराचा पसंतीक्रम आहे, असे समजण्यात येते. आयोगाला सादर केल्यानंतर पदांच्या पसंतीक्रमात बदल करण्यासंबंधीच्या विनंतीचा विचार केलाजात नाही.

पदांचा पसंतीक्रम निश्चित करताना व्यवस्थित अभ्यास करावा. या संदर्भात काही यशस्वी उमेदवारांचा सल्ला जरूर घ्यावा. आयोगाने जाहिरातीत प्रसिद्ध केलेली व पदांची क्रमवार यादी हीच बहुतेक उमेदवारांचा पसंतीक्रम असतो. मात्र, तुमच्या वैयक्तिक आवडीनुसार किंवा सोयीनुसार हा क्रम बदलू शकतो. या संदर्भात पदांचा पसंतीक्रम निश्चित करताना काही यशस्वी उमेदवारांचा सल्ला जरूर घ्यावा.

ज्या पदांसाठी तुम्ही परीक्षा दिली आहे त्या कामाचे स्वरूप समजून घेतल्यास पसंतीक्रम ठरवताना त्याचा उपयोग होईल.  मुलाखतीमध्येही याबाबत प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही उमेदवारांना कार्यालयीन कामकाजापेक्षा ‘फील्ड वर्क’ची आवड अधिक असू शकते.

असे उमेदवार पोलीस सेवेस प्रशासकीय सेवेच्या आधीचा पसंतीक्रम देऊ शकतात. अर्थशास्त्र/ आíथक कामकाजाची आवड असणाऱ्या उमेदवारांची पहिली पसंत वित्त व लेखा सेवा (अर्हता असल्यास) किंवा ACVAT असू शकते.

मुलाखतीपूर्वी प्रोफाइलमध्ये छंद, विशेष प्रावीण्याचे विषय इत्यादी माहिती अद्ययावत करायला हवी. याबाबत नेमका कोणता दृष्टिकोन अंगीकारावा याची चर्चा पुढील लेखामध्ये करूयात..

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here