प्रशासन प्रवेश- इतिहासाच्या तयारीचे समग्र धोरण

0
455

प्रस्तुत लेखात केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील इतिहास या

 

प्रस्तुत लेखात केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील इतिहास या घटकाचा आपण साकल्याने विचार करू. अभ्यासक्रम व आवश्यक संदर्भग्रंथ याविषयीच्या चर्चेच्या पलीकडे पोहोचत या घटकासाठी आवश्यक दृष्टिकोन विकसित करणे महत्त्वाचे ठरते.

‘प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतीय संस्कृती’ (कला, साहित्य व वास्तुकला), ‘आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ’, ‘स्वातंत्र्योत्तर भारताची पुनर्रचना व दृढीकरण’ आणि ‘आधुनिक जगाचा इतिहास’ या उपघटकांचा समावेश ‘इतिहास’ या घटकामध्ये होतो. या उपघटकांची अपेक्षित व्याप्ती व खोली ठरवणे हे अभ्यासक्रमाच्या आकलनासंदर्भातील मुख्य आव्हान आहे.

‘एनसीईआरटी’च्या क्रमिक पुस्तकांचे अध्ययन हा या तयारीचा पहिला व महत्त्वाचा टप्पा आहे. इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास! हा प्रवाह अनेक अंगांनी मिळून बनलेला असतो. तो प्रवाह समग्र असतो आणि म्हणूनच त्याचा अभ्यासही समग्रपणेच करायला हवा.

इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास. त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध व परिणाम याचाही अंतर्भाव या अभ्यासात होतो. म्हणूनच या विषयाच्या संपूर्ण आकलनासाठी घटना, घडामोडी व सनावळ्या असा सुटा-सुटा अभ्यास न करता उपरोक्त आयामांतील परस्परसंबंध लक्षात घेत समग्र अभ्यास करावा.

प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतीय संस्कृती या घटकाचा अभ्यास म्हणजे केवळ संस्कृतीचा थेट अभ्यास असा काहीसा चुकीचा समज आढळतो. २०१३ च्या मुख्य परीक्षेतील संगम साहित्यावरील प्रश्नाच्या उत्तरात तत्कालीन आíथक व सामाजिक परिस्थितीचे चित्रण यावर भाष्य करणे अपेक्षित होते तर मंदिर वास्तुकलेवरील प्रश्नाचे उत्तर देताना चोलांच्या काळात उच्चत्तम पातळी गाठणाऱ्या मंदिर वास्तुकलेच्या उत्क्रांतीच्या चर्चा करणे अपेक्षित होते.

यावरून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे, या उपघटकावरील प्रश्न केवळ संस्कृतीशी प्रत्यक्ष निगडित राहतील असे गृहीत धरता कामा नये. किंबहुना संस्कृतीच्या अनुषंगाने इतर अंगांचा वेध घेता येणं अपेक्षित आहे. अर्थात ही बाब नसíगकरीत्या ओघानेच येते. परंतु विषयांमध्ये विभाजित झालेल्या ज्ञानाचा ‘परंपरागत पद्धतशीर अभ्यास’ करण्याच्या आपल्या शिक्षणपद्धतीच्या सवयीमुळे बहुशाखीय दृष्टिकोन परीक्षार्थीनी नव्याने विकसित करावा.

संस्कृतीची निर्मिती, जडणघडण ही मानवी जीवनाच्या प्रवाहात समाविष्ट असते. त्या प्रवाहाचा ती अविभाज्य भाग असते. एखाद्या कालखंडातील अशा प्रकारची सांस्कृतिक अभिव्यक्ती सामाजिक, आíथक, राजकीय, धार्मिक अभिव्यक्तींवर परिणाम करते, त्यास आकार देते. हा अन्योन्य संबंध लक्षात न घेता केलेला संस्कृतीचा अभ्यास एकांगी तर ठरतोच, त्याचप्रमाणे त्याचे पर्यवसान माहिती घोकंपट्टीमध्ये होते. कोणत्याही कालखंडातील सामाजिक, आíथक, राजकीय, धार्मिक घटकांचा ‘आवश्यक’ तेवढा अभ्यास हा संस्कृतीच्या आकलनाची ताíकक पूर्तता करतो.

म्हणूनच प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांचा ‘आवश्यक किमान’ अभ्यास व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा.
आधुनिक भारताचा इतिहास व भारतीय स्वातंत्र्याची चळवळ यांचासुद्धा असा व्यापक अभ्यास करणे सोपे व सोयीचे आहे. हासुद्धा एक ताíकक उत्क्रांतीचा प्रवास ठरतो. मुघल साम्राज्याच्या ऱ्हासातून आणि राजकीय अस्थर्यामुळे उगम पावलेरी ब्रिटिश सत्ता, कंपनीचा काळ, कंपनीच्या कारभाराविरोधातील असंतोषातून झालेला १८५७ चा उठाव, १८५७ च्या उठावातून पुढे येणारी

सर्व भारतीय एक असल्याची राष्ट्रीयत्वाची संकल्पना, या राष्ट्रीयत्वाची पुढील काळातील वाढ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेतून (१८८५) झालेली राष्ट्रीयत्वाची प्रत्यक्ष व औपचारिक अभिव्यक्ती, त्यावर आधारित राष्ट्राच्या स्वातंत्र्याची चळवळ असा हा उत्क्रांत होत जाणारा प्रवास आहे.

या मुख्य धाग्याव्यतिरिक्त इतर अनेक धागे व त्यांची उत्क्रांती याचा सखोल अभ्यास करणे अपेक्षित आहे. सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या चळवळी, शैक्षणिक धोरण, प्रसारमाध्यमे, आदिवासी, शेतकऱ्यांचे उठाव, कामगारांच्या चळवळी, स्त्री-हक्कविषयक चळवळी इत्यादींचा यात समावेश होतो.

नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासमोर अस्तित्व टिकविण्यापासून अनेक आव्हाने होती. फाळणीमुळे झालेली िहसा व निर्वासितांचे लोंढे, भारतीय संस्थानिकांच्या विलीनीकरणाचा प्रश्न, प्रांतिक पुनर्रचनेचा प्रश्न, राष्ट्रांतर्गत प्रादेशिक राष्ट्रवादाचे आव्हान, भुकेचे, दारिद्रय़ाचे, बेरोजगारीचे, शिक्षणाच्या अभावाचे प्रश्न, मागासलेल्या किंबहुना वसाहतवादाच्या जोखडाखाली उद्ध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थेची समस्या अशी अनेक आव्हाने होती.

या समस्यांच्या, आव्हानांच्या सोडवणुकीसाठी अवलंबलेल्या धोरणांचा व त्या धोरणांच्या यशापयशांच्या अभ्यास, अपयशातून उगम पावणाऱ्या नवसामाजिक चळवळींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भारताच्या आíथक, परराष्ट्र, औद्योगिक व विज्ञानविषयक धोरणांचा यात समावेश होतो. याव्यतिरिक्त स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास अपेक्षित आहे.

आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती, वसाहतीकरण, वसाहतींसाठीची तीव्र स्पर्धा, पहिले जागतिक महायुद्ध, दोन जागतिक महायुद्धांमधील काळ, दुसरे जागतिक महायुद्ध, निर्वसाहतीकरण, शीतयुद्ध, शीतयुद्धोत्तर जग यांचा समावेश होतो. या घटकांचा अभ्यास वेगवेगळ्या अंगांनी करणे आवश्यक आहे. ‘अमेरिकन क्रांती हा व्यापारवादाविरोधातील आíथक उठाव होता.

अर्थ विस्तार करा’ असा प्रश्न २०१३ च्या मुख्य परीक्षेत विचारला गेला. अमेरिकन क्रांतीच्या कार्यकारणभावाचा वेध घेणारा हा प्रश्न ठरतो. याच्या अभ्यासाला अर्थकारणाची जोड मिळणे आवश्यक ठरते.

उपरोक्त सर्व उपघटक व त्यावरील विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप अभ्यासल्यास एक महत्त्वाची बाब निदर्शनास येते ती म्हणजे, एखाद्या घटनेकडे, व्यक्तीकडे वा समस्येकडे, तुटकपणे पाहण्यापेक्षा त्याच्या सामाजिक, आíथक, राजकीय, सांस्कृतिक पाश्र्वभूमी व संदर्भासहित पाहणे आवश्यक असते.

पाश्र्वभूमी व संदर्भाविना केलेला अभ्यास हा अभ्यास नसून तो केवळ माहिती साठविण्याचा प्रयत्न असतो. त्यादृष्टीने विचार करता ‘एनसीईआरटी’ची पाठय़पुस्तके अभ्यासणे हे इतिहासाच्या संकल्पनात्मक पायाभरणीची पहिली पायरी असते. त्यानंतर अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकासाठी प्रमाणित संदर्भपुस्तकाचे सखोल वाचन हा पुढचा टप्पा ठरतो.

 

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here