प्रभावी संवादकौशल्यासाठी..

0
337

विचारांतील स्पष्टपणा आणि ठामपणा हा अभ्यासाशिवाय प्राप्त होत नाही.

 

मुलाखत मंडळाच्या प्रश्नांना अनुरूप उत्तरे देताना शब्द मोजूनमापून वापरण्यासाठी आणि चपखल शब्दांची निवड करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व हवे.

मुलाखत मंडळाच्या प्रश्नांना अनुरूप उत्तरे देताना शब्द मोजूनमापून वापरण्यासाठी आणि चपखल शब्दांची निवड करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व हवे. वक्तृत्व, वादविवाद तसेच निबंध स्पर्धा यांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांची पाश्र्वभूमी असणाऱ्या उमेदवारांचे संवादकौशल्य साहजिकच उत्तम असते. एखाद्या विषयानुरूप, गरजेनुसार साध्या आणि चपखल शब्दांची निवड करणे आणि किमान शब्दांत महत्त्वाच्या मुद्दय़ांद्वारे आपले मत व्यक्त करणे, या सर्व बाबी प्रभावी संवादकौशल्याचा भाग मानल्या जातात.

विचारांतील स्पष्टपणा आणि ठामपणा हा अभ्यासाशिवाय प्राप्त होत नाही. अभ्यास चांगला असेल तर साहजिकच आत्मविश्वासाचा स्तरही उंचावतो. अभ्यास आणि आत्मविश्वास या दोहोंच्या साहाय्याने संवादाला धार प्राप्त होते. यासाठी प्रश्नानुरूप, विषयानुरूप आपली मते मांडणे फार आवश्यक आहे.

उलटपक्षी, जर संकल्पना स्पष्ट नसतील, अभ्यास तोकडा असेल तर त्याचा विपरीत परिणाम आत्मविश्वासावर आणि संवादाच्या शैलीवर होतो. अपुरी माहिती किंवा चुकीच्या माहितीवर आधारित उत्तर देताना उमेदवाराची विनाकारण दमछाक होते आणि विषयांतर होऊन तुमच्या निर्थक बडबडीने मुलाखत मंडळावर तुमची नकारात्मक छाप पडू शकते. यासाठी उमेदवाराने पारदर्शी असायला हवे.

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आलेच पाहिजे, विचारलेल्या विषयाची माहिती असलीच पाहिजे हे काही अनिवार्य नाही. फक्त मुलाखत तयारीचा भाग म्हणून नाही तर एकूणच स्पर्धा परीक्षा तयारीचा भाग म्हणून एक बाब उमेदवारांनी समजून घेतली पाहिजे आणि शिकली पाहिजे, ती ही की, योग्य वेळी ‘नाही’ म्हणता आले पाहिजे. ‘सर, याविषयी मला माहीत नाही, याविषयी मी वाचलेले नाही’ असे स्पष्टपणे सांगता यायला हवे. प्रभावी संवादासाठी स्पष्टपणा व पारदर्शकता महत्त्वाची आहे.

उमेदवारांनी आपल्या शब्दोच्चारांकडे लक्ष दिले पाहिजे. तुमचे उच्चार सुस्पष्ट असायला हवे. तुम्ही आत्मविश्वासाने बोलायला हवे. बोलताना थुंकी उडणार नाही, याची काळजी घ्यावी. शिंक आली तर तोंडावर रुमाल ठेवून शिंका आणि ‘सॉरी’ जरूर म्हणा. यासाठी मुलाखतीला जाण्यापूर्वी खिशात स्वच्छ रुमाल ठेवायला विसरू नका. ज्या शब्दांच्या उच्चारांबाबत तुम्ही साशंक आहात, ते शब्द वापरू नका.

आवेगात येऊन िहदी, इंग्रजी, उर्दू शब्दांचा वापर करू नका. बऱ्याचदा उमेदवाराची मराठी भाषा खूप चांगली असते. पण जर तो संवाद चांगल्या पद्धतीने करू शकला नाही तर त्याच्या शब्दसंपत्तीचा काही उपयोग होत नाही.
नागरी सेवा परीक्षेची मुलाखत इंग्रजी माध्यमातून देणाऱ्यांना भाषेवर प्रभुत्व नसल्यास न्यूनगंड येऊ शकतो.

मुलाखतीसाठी साधे व माहितीतले सामान्य शब्द वापरावेत. इंग्रजीची अवाजवी धास्ती बाळगू नये. या भीतीवर मात करण्यासाठी दररोज इंग्रजीतून संभाषण करावे. राज्य लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीसाठी माध्यमासंदर्भात वेगळा अर्ज वगरे भरून घेण्याची तरतूद उरलेली नाही.

पूर्व व मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या झाल्याने माध्यम नावाची समस्या मोडीत निघाली आहे. उमेदवाराचा कल लक्षात घेऊन त्यानुसार, मराठीत/इंग्रजीत मुलाखती होतात. यूपीएससीत मात्र माध्यम निवडावे लागते. यापूर्वी मराठी माध्यमात शिकलेल्या अनेक उमेदवारांनी इंग्रजीत मुलाखत देऊन यश मिळविल्याची अनेक उदाहरणे आहेत.

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी आपण मांडत असलेले मत साधार / अचूक आहे का, याचा विचार करायला हवा. पुरेशी माहिती असेल तरच आपले मत ठामपणे मांडावे. आपण मांडलेले मत ठोस असावे. तुमचे मत खोडून काढण्याची संधी मंडळाला मिळता कामा नये. अपुऱ्या वा चुकीच्या माहितीवर आधारावर मांडलेल्या मताचे समर्थन करण्याच्या प्रयत्नात उमेदवार अडकत जातो.

एक चूक लपविण्याच्या प्रयत्नात, पूर्ण मुलाखत हातातून निसटण्याची वेळ येते. चुकीची माहिती दर वेळेस जाणीवपूर्वकच दिली जाते असे नाही. अशा वेळेस मुलाखत मंडळ सदस्य उमेदवाराची चूक निदर्शनास आणून देतात. तेव्हा विनम्रतेने सत्याचा स्वीकार करावा. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल मुलाखत मंडळाच्या सदस्यांचे आभार मानावेत.

काही वेळेस मंडळाचे सदस्य आपले मत एखाद्या प्रश्नाच्या उत्तराच्या रूपाने देतात. जे खोडून काढता येत नाही. अशा वेळेस तर्कवितर्क करत त्यांना चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही विषयावर, मतावर किंवा मुलाखत मंडळाच्या शेऱ्यांवर औदासीन्य दाखवू नये.

मुलाखतीदरम्यान संवेदनशील सामाजिक मुद्दय़ांच्या संदर्भात प्रश्न विचारून तुमचा तार्किक विचार तपासला जाऊ शकतो. तुमचे तर्क सहज – स्वाभाविक असावेत. भावनाविवश होऊन उत्तरे देऊ नका. एका विशिष्ट विचारधारेच्या अधीन न जाता, तटस्थपणे विचार करून संतुलित मत व्यक्त करावे. आदर्शवादी उत्तरापेक्षा वास्तवाचे भान ठेवून व्यवहार्य उत्तर द्यावे.

प्रभावी संवादासाठी समोरच्यांशी नजरेचा संपर्क (Eye Contact) योग्य पद्धतीने ठेवला पाहिजे. संवादादरम्यान पूर्ण वेळ किंवा जास्त वेळ नजरानजर केल्यास वातावरण सहज-स्वाभाविक राहणार नाही. नजरेला नजर देऊन उत्तरे द्यायला हरकत नाही, पण समोरच्याकडे रोखून बघण्याने किंवा नजर गुंतवून ठेवण्याने, तुमच्या व्यक्तिमत्त्वाची चुकीची छाप पडते.

कधी कधी एकापाठोपाठ सलग दोन प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, अशा स्थितीत मुलाखतीचा शेवट होऊ शकतो. अशा वेळी आपले संतुलन बिघडू देऊ नका. चेहऱ्यावर नराश्याची छटा येता कामा नये. प्रसन्न चेहऱ्याने, आशावादी भावाने आणि आत्मविश्वासाने आपले आसन सोडावे आणि मुलाखत कक्षातून बाहेर यावे.

Loading...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here