दहावी बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक येत्या आठवड्यात?

हायलाइट्स:

  • दहावी बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक येत्या आठवड्यात?
  • बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याला सुरुवात
  • विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी संभाव्य वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने बारावी परीक्षेसाठी आज, शुक्रवारी १२ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याला सुरुवात होणार असून, दहावीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला पुढील आठवड्यात सुरुवात होईल, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबतचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय असतो. सरकारी सुट्ट्या, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील परीक्षा, पदभरती परीक्षा, सणांच्या सुट्ट्या आदींचा अभ्यास करून दहावी आणि बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करावे लागते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बारावीचे अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. त्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक येत्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी काही काळ संधी दिली जाईल. याबाबत कार्यवाही पूर्ण झाली, की अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध होईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे आणि परीक्षेबाबत कल्पना यावी, यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येते.

डॉ. भोसले यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, शाळा, ज्युनिअर कॉलेजांमध्ये नियमित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे बारावीचे अर्ज ठरलेल्या शुल्कासह १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत https://www.mahahsscboard.in/ या वेबसाइटहून ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परिक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेतील विद्यार्थी, ‘आयटीआय’चे विद्यार्थी यांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने तीन डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत भरावे लागतील. सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज विलंब शुल्कासह १३ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत भरता येईल. शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजांना चलन डाउनलोड करून बँकेत १२ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत शुल्क भरता येईल. शुल्क भरल्याच्या पावत्या शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजांना विभागीय मंडळाकडे २८ डिसेंबरपर्यंत जमा करायच्या आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकात दिली आहे. बारावीची परीक्षा लवकर सुरू होत असल्याने, परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. साधारण येत्या आठवड्यात दहावीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्य़ाध्यापक यांच्यासाठी अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

परीक्षा ऑफलाइनच होण्याची शक्यता

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना दोन्ही मिळून ३० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट होतात. शहरी आणि प्रामुख्याने ग्रामीण भागामधील शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या ‘आयटी’च्या सुविधा लक्षात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नाही, असे राज्य मंडळाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यातच राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, ऑफलाइन शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आगामी दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होण्याची दाट शक्यता असून, अधिकृत निर्णय येत्या काही दिवसांत मंडळाकडून प्रसिद्ध होईल

Source link