अकरावी प्रवेशांची अखेरची संधी; वेळापत्रक जाहीर

हायलाइट्स:

  • अकरावी प्रवेशांची अखेरची संधी
  • प्रवेशाविना राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशांना मुदतवाढ
  • येत्या ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार

अकरावीसाठी अजूनही ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांना शालेय शिक्षण विभागाने आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. विद्यार्थी २२ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी आणि एक प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी विभागाने यापूर्वीच राबवली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशही निश्चित केले आहेत. अनेक कॉलेज मध्ये वर्गही सुरू झाले आहे. मात्र तरीही काही विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. मुंबईत असे १४५ विद्यार्थी आहेत. पुण्यात ३३, अमरावतीत ३०, नागपुरात १४ आणि नाशिक मधला एक विद्यार्थी प्रवेशाविना राहिला आहे. या विद्यार्थ्यांची प्रवेशाची मोठी मागणी होत होती, त्यामुळे ही मुदतवाढ देत शिक्षण विभागाने येत्या ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत हे प्रवेश पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कसे असेल वेळापत्रक?

प्रथम प्राधान्य फेरीतील प्रवेश

– १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर – नवी नोंदणी, अर्जाचा पहिला भाग भरणे, पडताळणी, मिळालेला प्रवेश रद्द करणे आदी.
– १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर – प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीतील अलॉटमेंटसाठी अर्ज करणे
– १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर – मिळालेले कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश कन्फर्म करण्यासाठी ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’ वर क्लिक करून प्रवेश निश्चितीची कार्यवाही करणे

नवे प्रवेश

२३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर (दुपारी १२ वाजेपर्यंत) – नव्याने नोंदणी, अर्जाचा पहिला भाग भरणे, पडताळणी, आदी कार्यवाही

२३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर – शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत समुपदेशन आणि अलॉटमेंट

२३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर – मिळालेले कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश कन्फर्म करण्यासाठी ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’ वर क्लिक करून प्रवेश निश्चितीची कार्यवाही करणे

विद्यार्थ्यांनी हे ध्यानात घ्यावे की अलॉटमेंट मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. शिवाय अकरावी प्रवेशांची यंदाची ही अखेरची संधी असेल.


शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी पुढील ई-मेलद्वारे संपर्क साधता येईल –

मुंबई – mumbai.11thadmission@gmail.com
पुणे – 11thonlineadmissiondydpune@gmail.com
नागपूर- nagpur.11thadmission@gmail.com
नाशिक- nashik.11centralize@gmail.com
अमरावती- amravati.11centralize@gmail.com

Source link